रेडिओ टॅगिंगमाध्यमातून गिधाडांवर लक्ष
जीव साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांचे संवर्धन व्हावे, वाढ व्हावी,यासाठी प्रयत्न होत असतानाच संशोधकांनी रेडिओ टॅगिंगद्वारा गिधाडांच्या हालचाली व सवयी टिपण्याचे ठरवले आहे. मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात हा अनोखा प्रयोग सध्या सुरू आहे. भारतात अशा प्रकारचे गिधाडांचे टॅगिंग बहुधा प्रथमच होत आहे. या प्रयोगाद्वारे आतापर्यंत25 गिधाडांचे टॅगिंग करण्यात आले आहे. डेहराडून मधील भारतीय वन्यजीव संस्थेच्या ('डब्लूआयआय' ) च्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे गिधाडांची हालचाल आणि सवयींची माहिती मिळणे शक्य होणार आहे. संस्थेतील वैज्ञानिकांनी त्यासाठी इतर देशांत जाऊन विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
'डब्लूआयआय'च्या या उपक्रमात पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या झालर या गवताळ प्रदेशात पिंजरा ठेवण्यात आला आहे. गिधाडांना आकर्षित करण्यासाठी या पिंजऱ्यात ताजे मांसही ठेवले जाते. गिधाडांना पिंजऱ्यातील मांस घेण्याची सवय लागल्यावर त्यांचे रेडिओ टॅगिंग केले जाते. त्यासाठी गिधाडांच्या पाठीवर छोटा टॅग बसवण्यात येतो. पन्ना व्याघ्र प्रकल्पात गिधाडांच्या सात प्रजाती आहेत. त्यापैकी चार प्रजाती स्थानिक आहेत. उर्वरित तीन स्थलांतरित प्रजाती आहेत. गिधाडांमध्ये खूप लांबचे अंतर कापण्याची क्षमता असते. ती केवळ एका राज्यातून दुसऱ्या राज्यात च स्थलांतर करत नाहीत तर एका देशातून दुसऱ्या देशातही जातात. गिधाडांचे रेडिओ टॅगिंग केल्याने ती पन्ना प्रकल्पात काही पोहचली किंवा इतर ठिकाणी कशी जातात, हे समजणेही शक्य होईल. अस्तित्व धोक्यात आलेल्या गिधाडांच्या संवर्धनाचा ठोस आराखडा तयार करता येणार आहे.

Comments
Post a Comment